A Marathi Poem for a Friend

ऐक सये…

 

कुठे गेलीस सये तू
काहीच न सांगता
एकदम दूरच झालीस
काही समजून न घेता…

बालपणात असता कितीतरी गमती
तुझ्याविना रहायच्या अपूर्ण
छोट्या छोट्या साऱ्या कहाण्या
तुला सांगूनच सुफळ संपूर्ण …

एकच वर्ग एकच बाक
पण आपले स्वभाव अगदी भिन्न
तू होतीस फटाकडी
अन मी एकदम शांत…

नसलीस तू शेजारी तर
अजिबात नाही करमायचे
‘मैत्रिणीला पत्र’ लिहीताना
तुझेच नाव मायन्यात असायचे…

शाळेमध्ये मधल्या सुट्टीत
झाडाखाली खेळत असू
आजूबाजूला असला कोलाहल जरी
आपल्याच जगात रमत असू…

रंगीबेरंगी फुलपाखरे पाहताना
तू फोडणीची पोळी सरकावायाचीस
माझी मेथी मटकी उसळ
हक्काने अन आवडीने घ्यायचीस…

मला चित्रकलेत बऱ्यापैकी गती
तर तुला ते बिलकुल जमायचे नाही
तरी तुझ्या वहीतील आकृत्या नीटस कश्या
बाईंना कोडे उमगायचे नाही…

माझ्या अंगी व्यवस्थितपणा
तुझी मात्र सदाचीच घाई
धांदरटपणे काम करायचीस अन्
निस्तरतानां आपली पुरेवाट होई…

कुणी दुसरी माझ्याशी भांडली
की तिला पळता भुई थोडी करायचीस
अन मीच कधी रागवाले तुझ्यावर
तर कावरी बावरी व्हायचीस…

Friend

संध्याकाळच्या उतरत्या उन्हातील
अनंत गोष्टी अन लोभस गाणी
तुझ्याशी वाटून घ्यायच्या आहेत
श्रावण वयातील अनेक आठवणी…

ऐक सये मी शोधते आहे
बालपणातील हरवलेल्या खुणा
एकदातरी भेट ना गं
जशी होतीस तशी पुन्हा…

आलीस ना, मी तुला सांगते,
हातामध्ये हात गुंफू
केसांतील रुपेरी छटा विसरून
बालपणात जरा भटकून येऊ…

(I am sharing this poem which I had extemporaneously composed for my childhood friend. I apologize to all my readers who cannot read or understand Marathi.)

Advertisements